निर्णयाचे फायदे
फास्ट टॅग च्या माध्यमातून टोल वसुली झाल्यास यामध्ये अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. टोल नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. फास्ट-टॅग शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून टोल भरायचा झाल्यास किंवा फास्ट टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. राज्यात सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर टोल वसुली सुरु आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात टोल वसुल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.
केंद्र सरकारकडून २०२१ पासून अंमलबजावणी
केंद्र सरकारने सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केले होते. सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढत, १ जानेवारी २०२१ पासून सर्वचार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला होता. विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेल्या वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू करण्यात आला होता. पण याची अनेक राज्यात पूर्णपणे अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
काय आहे फास्ट टॅग?
फास्ट टॅग एक स्टिकर किंवा टॅग असते जे सहसा कारच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते. टोल शुल्क आकारण्यासाठी टोल नाक्यांवर बसवलेल्या स्कॅनरने ते स्कॅन केले जाते. या स्कॅनरद्वारे शुल्क आकारणीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. एकदा कारने टोल प्लाझा ओलांडला की, आवश्यक टोलची रक्कम बँक खात्यातून किंवा FASTag शी जोडलेल्या प्रीपेड वॉलमधून आपोआप कापली जाते. यामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याचीही आवश्यकता नसते. एकदा वाहनाने टोल नाका ओलांडला की, मालकाला टोल शुल्क आकारल्याचा एसएमएस अलर्ट त्याच्या मोबाइलवर मिळतो.