Land NA records शेतकरी असाल तर तुम्ही एनए शब्द ऐकला नसेल असं अजिबात होणार नाही. पण, एनएची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ असल्याची तक्रार वारंवार सामान्य नागरिकांकडून केली जात होती. एखादी जमीन एनए करायची म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रं घ्यावी लागायची आणि यासाठी बराच वेळ लागायचा. त्यामुळे मग एनएची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत.
याचाच भाग म्हणून जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी महसूल कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. पण, हे एनए म्हणजे नेमकं काय, ते का करतात, जमीन एनए करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, आणि एनएच्या प्रक्रियेत कोणते बदल करण्यात आलेत, याची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
एनए म्हणजे काय? एनए का करतात?
सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.
या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात. या रुपांतरणच्या प्रक्रियेसाठी ठरावीक ‘रुपांतरण कर’ आकारला जातो.
याशिवाय, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी-विक्री करता येत नाही. तो विकायचा असेल तर त्याचा एनए लेआऊट करूनच तो विकावा लागतो. त्यामुळे मग एनएच्या प्रक्रियेला महत्त्व आहे.
एनए करण्यासाठी अर्ज कुठे करायचा?
जमीन एनए करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. यासाठी तहसील कार्यालयात जाऊन तिथं एनएसाठीचा अर्ज घ्यावा लागतो किंवा तुम्ही स्वत: स्वतंत्र कागदावर अर्ज लिहून तो सादर करू शकता.
या अर्जासोबत काही कागदपत्रं जोडावी लागतात. यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा, सातबाऱ्याशी संबंधित फेरफार, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, ज्या जमिनीचा अकृषिक म्हणून वापर करायचा आहे, त्या जमिनीचा चतु:सीमा दर्शवणारा नकाशा, संबंधित जागेचा सर्व्हे किंवा गट नंबरचा नकाशा, आर्किटेक्टनं तयार केलेल्या बांधकाम लेआऊटच्या प्रती इ. कागदपत्रांचा समावेश होतो. या कागदपत्रांसोबतचा अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा लागतो.
महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या ‘महसूली कामकाज पुस्तिका’ या पुस्तकात या अर्जासाठीचा नमुना देण्यात आला आहे. त्याप्रमाणे तुम्ही तहसीलदारांकडे कागदपत्रांसहित अर्ज करू शकता.